लाखोंची इमारत उभी; पण पाण्याचा थेंब नाही!

पळसगाव-राका उपकेंद्रात मूलभूत सुविधांचा अभाव; रुग्णांच्या नातेवाईकांवर पाणी आणण्याची वेळ
गोंदिया | सुधीर शिवणकर, सिटी न्यूज : सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या पळसगाव-राका उपकेंद्रातील आरोग्य सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या नव्या इमारतीतच पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याची तक्रार समोर आली आहे.
राका, पळसगाव, भदूटोला, पिपरी यासह परिसरातील सुमारे सहा गावांमधील महिलांच्या प्रसूतीसाठी ही नवीन इमारत उभारण्यात आली आहे. बांधकाम पूर्ण होऊन जवळपास सहा-सात महिने उलटले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र अद्याप या इमारतीचे औपचारिक लोकार्पण झाले नसल्याचीही माहिती आहे.
दरम्यान, वरिष्ठांच्या सूचनेनंतर या इमारतीतून आरोग्यसेवा सुरू करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र सेवा सुरू झाल्यानंतरच इमारतीतील मूलभूत सुविधांचा प्रश्न समोर आला आहे.
शौचालयासाठीही बाहेरून पाणी आणण्याची वेळ
उपकेंद्रात पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने शौचालय आणि बाथरूमसाठी लागणारे पाणी रुग्णांच्या नातेवाईकांनीच दूरवरून आणावे लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. विशेषतः प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांच्या नातेवाईकांना या परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
आरोग्य केंद्राच्या इमारतीचे नियोजन आणि बांधकाम करताना पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली होती का, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
लाखोंचा खर्च, पण मूलभूत सुविधाच अपुऱ्या?
आरोग्यसेवेसाठी लाखो रुपये खर्च करून सुसज्ज इमारत उभारण्यात आली. मात्र या इमारतीत पाण्यासारखी प्राथमिक सुविधा उपलब्ध नसेल, तर रुग्णांना त्याचा प्रत्यक्ष लाभ कसा मिळणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
नवीन इमारत उभारण्यासोबतच पाणीपुरवठा, स्वच्छतागृह, बाथरूम आणि इतर आवश्यक मूलभूत सुविधांचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन उपकेंद्रात नियमित पाणीपुरवठा सुरू करावा आणि आवश्यक सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
इमारत नवी; मात्र सुविधा अपुऱ्या… या परिस्थितीची जबाबदारी कोण घेणार आणि आरोग्य विभागाकडून यावर तातडीने काय उपाययोजना केल्या जाणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सिटी न्यूजसाठी — सुधीर शिवणकर, गोंदिया



