“मोबाईल नंबर दे, नाहीतर फोटो-व्हिडिओ व्हायरल करतो”; तरुणीला धमकी दिल्याचा आरोप

पवनीत २६ वर्षीय तरुणाला अटक; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
भंडारा | पवनी | सुधीर शिवणकर, सिटी न्यूज : मोबाईल नंबर देण्यास नकार दिल्यानंतर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप एका १८ वर्षीय तरुणीने केला आहे. या प्रकरणी पवनी पोलिसांनी आसगाव येथील २६ वर्षीय अमोल भागवत वैद्य याला अटक केली आहे.
पवनी तालुक्यातील आसगाव परिसरात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, संबंधित तरुणी ढोलसर रोडवरील कालव्याजवळ रनिंग आणि व्यायामासाठी गेली असताना आरोपीने तिचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने तरुणीकडे मोबाईल नंबर मागितला. नंबर देण्यास नकार दिल्यास तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
कथित संभाषणाची रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याचा आरोप
या प्रकरणात एका अकादमीच्या शिक्षकासोबत आरोपीने केलेल्या कथित संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याचाही आरोप तरुणीने तक्रारीत केला आहे. या संभाषणामुळे आपली आणि आपल्या कुटुंबाची बदनामी झाल्याचे तिने म्हटले आहे.
तक्रारीच्या आधारे पवनी पोलिसांनी संबंधित कायदेशीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वडुले करीत आहेत.
मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या घटनेमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आणि नियमित रनिंग व व्यायाम करणाऱ्या तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
करिअर आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मुलींना नियमित व्यायाम करणे आवश्यक असते. मात्र अशा प्रकारच्या कथित घटनांमुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण होऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः तरुण-तरुणी व्यायामासाठी वापरत असलेल्या परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची मागणी पुढे येत आहे.
मुलींना त्यांच्या शिक्षण, व्यायाम आणि करिअरच्या तयारीपासून रोखण्याऐवजी त्यांना सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक आहे. संबंधित प्रकरणात पोलिस तपासातून नेमके तथ्य समोर येणार असून, कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
सिटी न्यूजसाठी — प्रतिनिधी सुधीर शिवणकर



