अपघातानंतर फरार कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

१०० ते १५० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी; ह्युंडाई व्हर्ना कार जप्त
नागपूर : मानकापूर परिसरात प्राणांतिक अपघात करून घटनास्थळावरून फरार झालेल्या वाहनाचा मानकापूर पोलिसांनी अखेर शोध लावला आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, अपघातग्रस्त ह्युंडाई व्हर्ना कारही जप्त केली आहे.
नागपूरच्या मानकापूर परिसरातील फरस चौक उड्डाणपुलावर १ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे २.४० वाजता भीषण अपघात झाला. ह्युंडाई व्हर्ना कारने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात २१ वर्षीय अमन डहारे यांचा मृत्यू झाला. मात्र, अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता.
घटनेनंतर मानकापूर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील तब्बल १०० ते १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तपासादरम्यान आरोपीने मुख्य रस्ता टाळून आडमार्गाचा वापर केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासासोबतच गुप्त माहितीच्या
अखेर पोलिसांनी वेलतूर येथून अक्षय चिरकूट कडू या २३ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अपघातासाठी वापरण्यात आलेली एमएच ४९ बी ०४०४ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची ह्युंडाई व्हर्ना कार जप्त करण्यात आली आहे.
मानकापूर पोलिसांच्या तपासामुळे अपघातानंतर फरार झालेल्या वाहनाचा शोध लागला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.



