agricultureBuldhanacitynewsLatest NewsMaharashtra

बारलिंग्यात कपाशी पिकावर तणनाशकाचा प्रयोग? शेतकऱ्याचे ७० हजारांचे नुकसान

एक एकर कपाशीचे पीक उद्ध्वस्त केल्याचा अतुल भुसारी यांचा आरोप; अंढेरा पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार, पंचनामा व नुकसानभरपाईची मागणी

सिंदखेडराजा | बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातून शेतकऱ्याच्या उभ्या पिकाची नासधूस केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारलिंगा शिवारातील एका एकर कपाशीच्या पिकावर अज्ञात व्यक्तीने तणनाशक फवारल्याचा आरोप शेतकरी अतुल दिनकर भुसारी यांनी केला आहे. तणनाशकाच्या फवारणीनंतर संपूर्ण कपाशीचे पीक खराब झाल्याने तब्बल ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्याने केला आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील बारलिंगा शिवारातील गट क्रमांक ६८ मध्ये हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. अतुल भुसारी यांच्या एक एकर क्षेत्रातील कपाशीच्या पिकावर अज्ञात व्यक्तीने तणनाशक फवारल्याचा त्यांचा आरोप आहे.

फवारणीनंतर काही कालावधीत कपाशीच्या पिकावर परिणाम झाल्याचे शेतकऱ्याच्या निदर्शनास आले. उभे पीक खराब झाल्याने संपूर्ण हंगामाच्या उत्पन्नावरच संकट ओढावले आहे. या शेतीच्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण अवलंबून असल्याचे अतुल भुसारी यांनी सांगितले.

या घटनेनंतर अतुल भुसारी यांनी अंढेरा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पिकाची नासधूस नेमकी कोणी केली, याचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच प्रशासनाने तातडीने शेताची पाहणी करून पंचनामा करावा आणि झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणीही शेतकऱ्याकडून करण्यात आली आहे.

मात्र, घटना घडून तीन दिवस उलटूनही प्रशासनाकडून अद्याप दखल घेतली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला प्रशासनाकडून कधी मदत मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, आमचे प्रतिनिधी गजानन राऊत यांनी शेतकरी अतुल भुसारी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. नेमका हा प्रकार कसा घडला? पिकाचे किती नुकसान झाले? आणि शेतकऱ्याची नेमकी मागणी काय आहे? पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये.

या प्रकरणात कपाशी पिकावर तणनाशक फवारून नुकसान केल्याचा शेतकऱ्याचा आरोप असून, या आरोपाची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास कशा पद्धतीने केला जातो, तसेच प्रशासनाकडून शेताची पाहणी करून नुकसानभरपाई दिली जाते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणातील पुढील अपडेट्ससाठी पाहत राहा सिटी न्यूज.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button