AmravaticitynewsCrime News

अमरावती ग्रामीण पोलिसांची मोठी प्रतिबंधात्मक कारवाई; चार गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांना तडीपार

परतवाडा आणि शिरखेड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील कारवाई; पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशाने कारवाई

अमरावती ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांविरोधात मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. परतवाडा आणि शिरखेड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या दोन गुन्हेगारी टोळ्यांमधील चार इसमांना अमरावती जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.

परतवाडा येथील पेन्शनपुरा परिसरातील संतोष नंदलाल पेंदे आणि निखील जोगेश्वर मंडले या दोघांना सहा महिन्यांसाठी अमरावती जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तर मोर्शी तालुक्यातील राजुरवाडी येथील कुलदिप दादाराव अंभोरे आणि अक्षय सुधाकर मोहोकार यांना तीन महिन्यांसाठी जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, या चौघांविरोधात अवैध शस्त्र बाळगणे, शरीराविरुद्धचे गुन्हे, मालमत्तेविरोधातील गुन्हे तसेच परिसरात दहशत निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 55 अंतर्गत तडीपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते.

या प्रकरणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली. चौकशीअंती पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी 22 सप्टेंबर 2026 रोजी तडीपारीचे आदेश जारी केले. या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली असून, संबंधित चारही इसमांना अमरावती जिल्ह्याबाहेर पाठवण्यात आले आहे.

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका कायम राहणार असल्याचे अमरावती ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button