citynewsCrime Newslatestnewss breakingnewsMaharashtraNagpurCrime

नागपुरात शेजारी महिलेवर करवतीने हल्ला; आरोपी ताब्यात

सदर परिसरातील घटना; ४२ वर्षीय महिला गंभीर जखमी, मेडिकलमध्ये उपचार सुरू

नागपुरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेजारी राहणाऱ्या ४२ वर्षीय महिलेवर करवतीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ५७ वर्षीय राजेश पिल्ले याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आणि जखमी महिला हे शेजारी असून त्यांची घरे एकमेकांना लागून आहेत. परिसरात जाण्यासाठी एकच गल्ली असल्याने दोघांमध्ये यापूर्वीही छोट्या-मोठ्या कारणांवरून वाद होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच वादाचा राग मनात धरून आरोपीने महिलेवर लाकूड कापण्याच्या करवतीने हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

हल्ल्यात महिलेच्या शरीराच्या विविध भागांवर करवतीने वार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी महिलेला तातडीने मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी जुन्या कलम ३०७ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पोलीस ठाण्याचे एपीआय राठोड, एपीआय मेघा गोखले आणि डीबी पथकाने तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर यापूर्वी मानसिक आजारासाठी उपचार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय उमेश तायडे करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button