BreakingNewsMaharashtracitynewsCrime NewsNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात सराईत गुन्हेगाराकडून दोन पिस्तूल जप्त

१४ जिवंत काडतुसे आणि चार मॅगझीनसह १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त; धरमपेठेत पोलिसांची कारवाई

नागपुरात गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले आहे. धरमपेठ परिसरात सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी दोन देशी बनावटीचे पिस्तूल, १४ जिवंत राउंड आणि चार मॅगझीनसह तब्बल १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरी विरोधी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. योगेश यादवलाल सिरीया (वय २८) याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच त्याच्या लाल रंगाच्या अॅक्टिव्हा मोपेडच्या डिक्कीत जिवंत काडतुसे असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी धरमपेठ येथील आनंद झेरॉक्स सेंटरसमोर सापळा रचला. आरोपी तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता दोन देशी बनावटीचे पिस्तूल, १४ जिवंत राउंड, चार मॅगझीन, अॅक्टिव्हा मोपेड आणि दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी योगेश सिरीया हा जरीपटका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या शस्त्र प्रकरणातील पाहिजे आरोपी आहे. या कारवाईनंतर शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button