citynewsCrime NewsWardha

वर्ध्यात शेतकऱ्यांच्या मोटारपंप चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

सावंगी मेघे पोलिसांकडून पाच आरोपींना अटक; १ लाख ९६ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त

वर्ध्यात शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारपंप आणि केबल चोरी करणाऱ्या टोळीचा सावंगी मेघे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पडेगाव, नागठाणा आणि वडद शिवारातील चोरीच्या घटनांचा तपास करत पोलिसांनी तब्बल पाच आरोपींना अटक केली. आरोपींकडून मोटारपंप, तांबे, वाहन आणि मोबाईल असा एकूण १ लाख ९६ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारपंप चोरीला गेल्याने अनेक शेतकऱ्यांसमोर पिकांना पाणी देण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. पडेगाव येथील एका शेतकऱ्याने चोरी झालेली मोटारपंप पुन्हा मिळण्याची आशा सोडल्यानंतर नवीन मोटार खरेदी करण्यासाठी घरातील सोन्याचे दागिने गहाण ठेवले होते.

मात्र, नवीन मोटार खरेदी केल्यानंतर काही वेळातच सावंगी मेघे पोलिसांचा संबंधित शेतकऱ्याला फोन आला. चोरीला गेलेली मोटारपंप पोलिसांना सापडल्याची माहिती मिळताच शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला. पोलिसांच्या तपासात चोरीच्या घटनांमागे एक टोळी असल्याचे समोर आले.

या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीच्या मोटारपंपांसह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या चोरीच्या मोटारपंपांपैकी संबंधित शेतकऱ्यांच्या मोटारपंप त्यांना परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

या कारवाईमुळे मोटारपंप चोरीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चोरीला गेलेली मोटारपंप परत मिळाल्याने पिकांना पाणी देण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. या टोळीने आणखी किती चोरीच्या घटना केल्या आहेत, याचा पुढील तपास सावंगी मेघे पोलीस करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button