citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurPolice

महात्मा गांधी हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच!

दीड महिन्यापासून मूलभूत सुविधांसाठी लढा; पिण्याचे पाणी आणि मेसमधील जेवणाच्या दर्जावर विद्यार्थ्यांचे प्रश्न

वर्धा | प्रतिनिधी

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे विविध मूलभूत मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन अद्यापही कायम आहे. गेल्या दीड महिन्यापासून सुमारे १०० विद्यार्थी आंदोलन करत असून, विद्यापीठातील पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच मेसमधील जेवणाच्या दर्जाबाबत विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होत नसल्याची समस्या आहे. याशिवाय मेसमध्ये वारंवार एकाच प्रकारची भाजी दिली जात असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. मूलभूत सुविधांशी संबंधित या समस्यांकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

दरम्यान, आंदोलनादरम्यान आपल्या समस्या मांडणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्टिकेट करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच याच आंदोलनातील ६ विद्यार्थ्यांवर रस्टिकेशनची कारवाई करून त्यांना हॉस्टेलमधूनही बाहेर काढल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.

या आंदोलनात उत्तर प्रदेश, बिहार, तमिळनाडू आणि राजस्थान यांसह विविध राज्यांतील विद्यार्थी सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषद भवनात पोहोचून माध्यमांसमोर आपल्या विविध समस्या आणि मागण्या मांडल्या.

गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपांवर विद्यापीठ प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर कोणती कार्यवाही केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button