citynewsLatest NewsMaharashtraYavatmal

यवतमाळमध्ये SC-ST निधी वळविल्याच्या आरोपावरून आंदोलन!

४ हजार ६०१ कोटींचा निधी वळविल्याचा संघटनांचा आरोप; आदिवासी विकासमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा, आंदोलक स्थानबद्ध

यवतमाळ | दुर्गेश कान्हु

यवतमाळमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठीच्या बजेटमधील निधी वळविल्याच्या आरोपावरून विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. SC-ST समूहांसाठीच्या बजेटमधील तब्बल ४ हजार ६०१ कोटी रुपयांचा निधी वळविल्याचा आरोप करत विविध संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

श्रीमती शोभादेवी जाधव मंगल कार्यालय परिसरात आंदोलक एकत्र आले. त्यानंतर त्यांनी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढला. मात्र आंदोलक राणा प्रताप गेटजवळ पोहोचताच पोलिसांनी त्यांना अडवत स्थानबद्ध केले.

पोलिसांच्या या कारवाईदरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलकांना ताब्यात घेतल्याने परिसरात मोठी गर्दी झाली.

या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांसह वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. SC-ST बजेटमधील निधीबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि संबंधित निधीचा योग्य वापर करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

दरम्यान, SC-ST निधीच्या कथित वळवणुकीचा मुद्दा राज्यात यापूर्वीही सामाजिक संघटनांकडून उपस्थित करण्यात आला आहे. काही संघटनांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी SC-ST विकासासाठी राखीव निधी वापरल्याचा आरोप करत निधी परत करण्याची मागणी केली आहे.

बाईट — नीरज वाघमारे
नगरसेवक, न.पा. यवतमाळ

यवतमाळमध्ये SC-ST बजेटमधील निधीच्या मुद्द्यावरून झालेल्या या आंदोलनामुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आंदोलकांनी केलेल्या आरोपांवर सरकारकडून अधिकृतपणे काय भूमिका मांडली जाते, तसेच निधीच्या वापराबाबत कोणती माहिती समोर येते, याकडे आता लक्ष लागले आहे.

दुर्गेश कान्हु, यवतमाळ.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button