बडनेऱ्यात तलवारीसह युवक ताब्यात!

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई; ७ इंच पाते आणि २८ इंच लांबीची लोखंडी तलवार जप्त
बडनेरा | प्रतिनिधी
बडनेरा शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच आहे. गोपनीय माहितीच्या आधारे बडनेरा पोलिसांनी सापळा रचत धारदार लोखंडी तलवार घेऊन फिरणाऱ्या २३ वर्षीय युवकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून तलवार जप्त केली आहे.
पोलिसांना प्रज्वल संजय कैथवास, वय २३, रा. भगतसिंग चौक, जुनी वस्ती, बडनेरा, हा लोखंडी तलवार घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खात्री केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान त्याच्याकडून सुमारे ७ इंच पाते आणि २८ इंच लांबीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली.
या प्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५९७/२०२६ नुसार आर्म्स अॅक्टच्या कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक निलेश करे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत सागर सरदार, सचिन श्रीवास, पवन देशमुख आणि अतुल तायडे सहभागी होते.
दरम्यान, बडनेरा पोलिसांकडून अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू असून, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गस्त आणि तपासणी अधिक तीव्र करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.



