AmravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrime

सायन्सकोअर मैदानात तडीपार गुन्हेगारांकडून पिस्टल-चाकू जप्त!

अमरावती शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दोघे ताब्यात, २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

अमरावती : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. शहर गुन्हे शाखेने सायन्सकोअर मैदान परिसरात कारवाई करत दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीमध्ये एक पिस्टल मॅगझीनसह आणि एक चाकू आढळून आला. पोलिसांनी दोन्ही शस्त्रे जप्त केली असून आरोपींना पुढील कारवाईसाठी सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार ११ सप्टेंबर २०२६ रोजी शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे तसेच अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी अमरावती शहर आयुक्तालयाच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगून सायन्सकोअर मैदान परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीची खात्री करून गुन्हे शाखेच्या पथकाने सायन्सकोअर मैदान परिसरात शोधमोहीम राबवली. यावेळी संशयित दोघांना घेराव घालून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या अंगझडतीमध्ये पॅन्टच्या कमरेच्या मागील बाजूस एक पिस्टल आणि एक चाकू खोचलेला आढळून आला. पोलिसांनी दोन्ही शस्त्रे तात्काळ जप्त केली.

या कारवाईत मयुर उर्फ माया प्रकाश चव्हाण, वय २० वर्षे, रा. लोहार लाईन, विलासनगर, अमरावती आणि राज गोकुल सोळंके, वय २२ वर्षे, रा. लोहार लाईन, विलासनगर, अमरावती यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये अंदाजे २५ हजार रुपये किमतीचे मॅगझीनसह एक पिस्टल आणि अंदाजे ५०० रुपये किमतीचा लोखंडी पाते असलेला एक चाकू, असा एकूण २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आहे.

आरोपी आणि जप्त शस्त्रे पुढील कायदेशीर कारवाईसाठी सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहेत. या प्रकरणी पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई पोलिसांकडून करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपआयुक्त शाम घुगे, पोलीस उपआयुक्त मुख्यालय प्रांजली सोनावणे आणि सहायक पोलीस आयुक्त राजापेठ विभाग संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे, पोलीस निरीक्षक अतुल वर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दशरथ आडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक फिरोज खान यांच्यासह गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि अंमलदारांनी सहभाग घेतला.

सणासुदीच्या काळात शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेने केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button