सावंगा बु पुनर्वसित गावात १७ वर्षांची तान्हा पोळ्याची परंपरा कायम!

मातीच्या बैलांसह चिमुकल्यांचा उत्साह; कलागुणांना वाव देत गुणवंत विद्यार्थी आणि व्यसनमुक्त नागरिकांचा सत्कार
अमरावती | चांदूर रेल्वे
महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीत बैलपोळ्याला विशेष महत्त्व आहे. शेतकऱ्याच्या शेतीकामात मोलाची साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण अमावस्येला बैलपोळा साजरा केला जातो. याच परंपरेची ओळख लहान मुलांना व्हावी, त्यांच्यामध्ये बैलांप्रती आपुलकी आणि शेतीविषयी प्रेम निर्माण व्हावे, तसेच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विदर्भात बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा बु पुनर्वसित गावानेही ही परंपरा तब्बल १७ वर्षांपासून जपली आहे. शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही तान्हा पोळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात गावातील चिमुकल्यांनी आपल्या कल्पकतेतून आणि कलेतून तयार केलेले मातीचे बैल आणले होते.
मातीच्या बैलांचा आकार, देखावा आणि आकर्षक सजावट यानुसार उत्कृष्ट बैलजोड्यांची निवड करून विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. यामध्ये हर्षल गोडघाटे याने प्रथम क्रमांक पटकावला. रुद्र सोळंके याला द्वितीय, रितेश राऊत याला तृतीय, धनश्री ठाकरे हिला चतुर्थ तर आजीया हाफिज खान हिला पाचवा क्रमांक मिळाला. वेदांश राऊत याला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. याशिवाय तान्हा पोळ्यात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
या उपक्रमामुळे गावातील लहान मुलांसह नागरिकांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला. पारंपरिक सणाच्या माध्यमातून चिमुकल्यांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले, तर ग्रामस्थांनीही त्यांच्या उत्साहाला दाद दिली.
यावेळी बोलताना संदीपभाऊ सोळंके यांनी सावंगा बु गावाच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला. बेंबळा प्रकल्पासाठी गाव भूसंपादित झाल्यामुळे या गावातील मोठ्या बैलांचा पोळा कालांतराने संपुष्टात आला. त्यामुळे नवीन पिढीला बैलपोळ्याची आणि शेतीशी जोडलेल्या परंपरेची माहिती मिळावी, तसेच मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी तान्हा पोळ्याचे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. राजीव अंबापुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव, ग्रामसेवक गजभिये साहेब, पोलिस पाटील सुनीलभाऊ सोळंके, श्री मलवार सर, मुख्याध्यापक निचत सर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पूजा रुद्रकार, जिल्हा कामगार समितीचे सचिव संदीपभाऊ सोळंके, माजी सरपंच ज्ञानेश्वर सोळंके यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तान्हा पोळ्याच्या कार्यक्रमासोबतच गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच व्यसनमुक्तीचा मार्ग स्वीकारलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ पारंपरिक सणापुरता मर्यादित न राहता सामाजिक आणि शैक्षणिक संदेश देणारा ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन डुबे, विलास इरतकार, शाम मारोटकर, वैभव गिलबिले, अमोल लोखंडे, वैभव सोळंके, अमर बळी, देवेंद्र चचाणे, तन्मय सोळंके यांच्यासह गावातील तरुणांनी परिश्रम घेतले.
सावंगा बु पुनर्वसित गावाने बदलत्या काळातही तान्हा पोळ्याची १७ वर्षांची परंपरा जपत ग्रामीण संस्कृती, शेती आणि बैलांविषयीची कृतज्ञता नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून आणि परिसरातून कौतुक होत आहे.



