गोगाबाबा शोभायात्रेत रक्तरंजित थरार; चाकू हल्ल्यात २० वर्षीय युवकाचा मृत्यू

कपिलवस्तू नगरात चाकू हल्ल्यात विशाल मनोहरे गंभीर जखमी; उपचारादरम्यान मृत्यू, अल्पवयीन संशयित ताब्यात
अमरावती | गाडगे नगर
अमरावतीच्या गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कपिलवस्तू नगर परिसरात गोगाबाबा शोभायात्रेदरम्यान २० वर्षीय युवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शोभायात्रा सुरू असताना विशाल राजेश मनोहरे याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विशालचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास कपिलवस्तू नगर परिसरात गोगाबाबा शोभायात्रा सुरू होती. याचवेळी २० वर्षीय विशाल राजेश मनोहरे हा घरातून शोभायात्रा पाहण्यासाठी बाहेर पडला होता.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विशाल आणि हल्लेखोरामध्ये सुमारे १५ दिवसांपूर्वी जुन्या कारणावरून वाद झाला होता. याच वादातून अल्पवयीन युवकाने विशालवर चाकूने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अचानक झालेल्या चाकू हल्ल्यात विशाल गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याची प्रकृती अधिक खालावली आणि अखेर विशालचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गाडगे नगर पोलीस आणि क्राईम ब्रँचच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे घटनेबाबत चौकशी सुरू आहे.
दरम्यान, विशाल मनोहरे हा आपल्या आजीकडे राहत होता. त्याचे आई-वडील नसल्याने तो अनाथ असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गोगाबाबा शोभायात्रेसारख्या धार्मिक कार्यक्रमादरम्यानच झालेल्या या हत्येमुळे कपिलवस्तू नगर परिसरात खळबळ उडाली आहे. शोभायात्रेच्या गर्दीत नेमका हा हल्ला कसा झाला, त्यामागे जुन्या वादाव्यतिरिक्त आणखी काही कारण आहे का आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास गाडगे नगर पोलीस आणि क्राईम ब्रँचकडून सुरू आहे.
या प्रकरणातील पुढील तपासातून हत्येमागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होण्याची शक्यता आहे.



