अकोल्यात बंद स्ट्रीट लाइटचा अंधार; गतिरोधक न दिसल्याने दुचाकीचा अपघात!

अकोला-वाशिम बायपास ते बालापूर नाका मार्गावर दोन जण जखमी; एकाची प्रकृती गंभीर
अकोला : शहरातील अकोला-वाशिम बायपास ते बालापूर नाका मार्गावर बंद स्ट्रीट लाइटमुळे रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका वाढला आहे. मंगळवारी रात्री नवीन किराणा मार्केटजवळ घनदाट अंधारामुळे रस्त्यावरील गतिरोधक दुचाकीस्वारांना दिसला नाही आणि त्याच गतिरोधकावर दुचाकी आदळून अपघात झाला.
MH 30 AU 7994 क्रमांकाची दुचाकी गतिरोधकावर आदळल्याने झालेल्या या दुर्घटनेत दुचाकीवरील दोन जण जखमी झाले. यातील एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत दोन्ही जखमींना अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं. सध्या दोघांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या मार्गावरील स्ट्रीट लाइट अनेक ठिकाणी बंद असल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. रस्त्यावर असलेले गतिरोधक, खड्डे किंवा इतर अडथळे अंधारात स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका आणखी वाढत आहे.
या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अपघात होण्याची वाट पाहण्याऐवजी बंद स्ट्रीट लाइट तातडीने सुरू करावेत आणि रस्त्यावरील गतिरोधकांवर योग्य प्रकाश व सुरक्षेची चिन्हं लावावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.
आता प्रशासन या गंभीर समस्येची दखल घेऊन स्ट्रीट लाइट सुरू करणार का आणि या मार्गावरील अपघात टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कधी करणार, याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे.



