Amravati GramincitynewsCrime NewsDharniLatest NewsMaharashtraMaharashtraCrime

मेळघाटात जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध महिलेची हत्या; २४ तासांत आरोपी पोलिसांच्या ताब्यात

चांदीच्या टागळी कड्याने गळा आवळल्याचा पोलिसांचा आरोप; चौकशीत हत्येची कबुली दिल्याची माहिती

अमरावती : मेळघाटातील धारणी तालुक्यात जादूटोणा करत असल्याच्या संशयातून ५८ वर्षीय महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समोती रामभाऊ कास्देकर यांची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत रामलाल लक्ष्मण कास्देकर याला ताब्यात घेतले आहे. मृत महिलेच्याच गळ्यातील चांदीच्या टागळी कड्याने गळा आवळून तिची हत्या केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. चौकशीदरम्यान आरोपीने हत्येची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अमरावती ग्रामीणमधील धारणी तालुक्यातील गोबरकहु शेतशिवारात २७ ऑगस्ट रोजी ५८ वर्षीय समोती रामभाऊ कास्देकर यांचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली होती.

यानंतर २८ ऑगस्ट रोजी मृत महिलेचा मुलगा राजू रामभाऊ कास्देकर यांनी धारणी पोलीस ठाण्यात जबानी रिपोर्ट दाखल केला. त्यावरून अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि धारणी पोलिसांना तातडीने तपास करून आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि धारणी पोलीस ठाण्याच्या पथकांनी तपास सुरू केला. घटनास्थळावरील माहिती आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला.

तपासादरम्यान रामलाल लक्ष्मण कास्देकर हा गावाच्या बाजूला असलेल्या शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने संबंधित शेतात जाऊन रामलाल कास्देकर याला ताब्यात घेतले.

पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपीने मृत समोती कास्देकर या जादूटोणा करत असल्यामुळे आपल्या कुटुंबाला त्रास होत असल्याचा संशय व्यक्त केला. याच संशयातून त्याने महिलेची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने मृत महिलेच्या गळ्यातील चांदीच्या टागळी कड्याचा वापर करून तिचा गळा आवळला, त्यात तिचा मृत्यू झाला.

गुन्हा घडल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याने या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात अमरावती ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

या संपूर्ण कारवाईत अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि धारणी पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे तपास केला. आरोपीविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, या हत्येमागील संपूर्ण घटनाक्रमाचा तपास पोलीस करत आहेत.

जादूटोण्याच्या संशयातून हत्या?

मेळघाटातील या घटनेमुळे अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या संशयातून होणाऱ्या हिंसक घटनांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. केवळ संशयाच्या आधारावर एका वृद्ध महिलेचा जीव गेल्याचा आरोप असून, या प्रकरणात पोलिसांच्या तपासातून पुढील बाबी आणखी स्पष्ट होणार आहेत.

जादूटोण्याच्या संशयातून ५८ वर्षीय महिलेची हत्या आणि अवघ्या २४ तासांत आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याने धारणी तालुक्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button