BuldhanacitynewsLatest NewsMaharashtra

मेहकरमध्ये आरोग्य व्यवस्थेची लक्तरे! रस्त्यालगत महिलेची प्रसूती

ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटरवर प्रसूती; डॉक्टर उपलब्ध नसल्याचा आरोप, माता-बाळाला खासगी रुग्णालयात हलवले

बुलढाणा : मेहकर शहरातून सरकारी आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर प्रसूतीच्या वेदनांनी विव्हळणाऱ्या महिलेची रस्त्यालगतच्या ओट्यावर प्रसूती झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बाळाचा काही भाग बाहेर आणि काही भाग आत अडकलेला असतानाही रुग्णालयातून तातडीची मदत मिळाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास पिसे परिवारातील महिलेला अचानक प्रसूतीवेदना सुरू झाल्या. घरी मदतीसाठी कोणी नसल्याने ती उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या दिशेने निघाली. मात्र रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटर अंतरावरच ती रस्त्यालगतच्या ओट्यावर कोसळली.

बाळाचा काही भाग बाहेर, तर काही भाग आत

महिलेची अवस्था गंभीर होती. प्रसूतीदरम्यान बाळाचा काही भाग बाहेर आला होता, तर काही भाग आत अडकला असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे तातडीने वैद्यकीय मदतीची गरज होती.

हा प्रकार पाहून बालाजी अर्बनचे अध्यक्ष योगेश सौभागे यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली आणि मदतीची विनंती केली, अशी माहिती समोर आली आहे.

डॉक्टर उपलब्ध नसल्याचा आरोप

मात्र, डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगत स्टाफ नर्सने घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपामुळे सरकारी रुग्णालयातील आपत्कालीन सेवेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

अखेर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन खासगी रुग्णालयातील नर्सला घटनास्थळी बोलावण्यात आले. सौभागे परिवारातील महिलांच्या मदतीने रस्त्यालगतच महिलेची प्रसूती करण्यात आली.

यानंतर माता आणि नवजात बाळाला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

नाईट ड्युटीवरील डॉक्टर कुठे होते?

या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नाईट ड्युटीवर असलेले डॉक्टर नेमके कुठे होते? आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयातील कर्मचारी घटनास्थळी का पोहोचले नाहीत? रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर असलेल्या महिलेला तातडीची वैद्यकीय मदत का मिळाली नाही?

या प्रश्नांची उत्तरे आता रुग्णालय प्रशासनाकडून मिळणे आवश्यक आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर संबंधित ग्रामीण रुग्णालय प्रशासनाची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे महिलेची प्रसूती रस्त्यावर होण्यामागची नेमकी परिस्थिती आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची भूमिका चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

सरकारी रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर एखाद्या महिलेची रस्त्यावर प्रसूती होत असेल, तर हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नसून संपूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासन कोणती उपाययोजना करणार, याकडे आता मेहकरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button