AmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

डफरीन रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी

व्हेंटिलेटर व जीवनरक्षक मशिनरीच्या देखभालीतील निष्काळजीपणाची चौकशी करा; जबाबदार अभियंत्यावर कारवाईची प्रवीण हरमकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अमरावती : जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालय अर्थात डफरीन रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात झालेल्या दुर्घटनेत तीन बालकांचा मृत्यू झाल्यानंतर आता जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेना शहर प्रमुख तथा अमरावती महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण वसंतराव हरमकर यांनी यासंदर्भात अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधितांवर कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

डफरीन रुग्णालयातील व्हेंटिलेटर तसेच इतर अत्यावश्यक जीवनरक्षक मशिनरीच्या देखभाल आणि दुरुस्तीमध्ये निष्काळजीपणा झाला असल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. या निष्काळजीपणामुळे तीन निरपराध बालकांना जीव गमवावा लागल्याचे सांगत ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक असल्याचे हरमकर यांनी नमूद केले.

या प्रकरणात केवळ कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांवर कारवाई करून चालणार नसून, रुग्णालयातील व्हेंटिलेटर आणि इतर जीवनरक्षक उपकरणांची नियमित तपासणी व देखभाल करण्याची जबाबदारी असलेल्या अभियंता आणि तांत्रिक अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

जबाबदार अभियंत्याची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हरमकर यांनी केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नियुक्त करून दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच मृत बालकांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

मूळ कारण शोधून जबाबदारी निश्चित केल्याशिवाय अशा दुर्घटनांना आळा बसणार नाही. त्यामुळे केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांपुरती कारवाई मर्यादित न ठेवता या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन संबंधित सर्व जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका हरमकर यांनी मांडली आहे.

या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह आरोग्य विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, आरोग्य सेवा उपसंचालक आणि बायो-मेडिकल विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत.

डफरीन रुग्णालयातील या गंभीर घटनेनंतर प्रशासनाने चौकशी करून दोषी व्यक्तींवर नेमकी कोणती कारवाई केली जाते, याकडे आता अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button