Accident NewsAccidentNewscitynewsJalgaonLatest NewsMaharashtra

कॉलेज सुटल्यानंतर घराकडे जाताना काळाचा घाला; आयटीआय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

बोलेरोला वाचवताना दुचाकी थेट टँकरखाली; एक विद्यार्थी गंभीर, तर दुसरा किरकोळ जखमी

जळगाव : जळगाव शहरातील अजिंठा चौकाजवळील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात सोमवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने अचानक आलेल्या बोलेरो वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील विद्यार्थ्याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट बाजूने जाणाऱ्या टँकरखाली घुसली. या भीषण अपघातात आयटीआयच्या एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत.

वरुण विजय सुरवाडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तर पवन अनिल अडकमोल हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. नीरज रवींद्र कोचुरे याला किरकोळ दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरुण, पवन आणि नीरज हे तिघेही जळगाव येथील शासकीय आयटीआयचे विद्यार्थी होते. सोमवारी कॉलेज सुटल्यानंतर तिघेही एकाच दुचाकीवरून जळगावहून भुसावळच्या दिशेने जात होते.

ट्रान्सपोर्ट नगर परिसरात पोहोचल्यानंतर समोरून अचानक एक बोलेरो वाहन विरुद्ध दिशेने आल्याचे सांगण्यात येत आहे. या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराचा ताबा सुटला आणि दुचाकी बाजूने जात असलेल्या टँकरखाली घुसली.

नागरिकांनी तातडीने मदतकार्य केले

अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढून उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMC) दाखल करण्यात आले.

मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर वरुण विजय सुरवाडे याला मृत घोषित केले. पवन अडकमोल याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत, तर नीरज कोचुरे याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

एमआयडीसी पोलिसांची घटनास्थळी धाव

अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातस्थळी पाहणी करत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.

या अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांकडून अपघाताच्या कारणाचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, वरुणच्या मृत्यूची बातमी समजताच रुग्णालय परिसरात त्याचे नातेवाईक आणि वर्गमित्रांनी मोठा आक्रोश केला. तरुण विद्यार्थ्याच्या अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचा आणि बोलेरो वाहनाच्या भूमिकेचा पोलीस तपास करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button