२५ हजारांची लाच घेताना भूमापक ACBच्या जाळ्यात

पारशिवनीतील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात कारवाई; शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर रचला सापळा
पारशिवनी | प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. जमिनीच्या सरकारी अभिलेखातील विभागणीच्या कामासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमापकाला ACBच्या पथकाने रंगेहात पकडले. शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
शेतकऱ्याकडे लाचेची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणा बाराबाई येथील एका युवा शेतकऱ्याच्या जमिनीची सरकारी अभिलेखात विभागणी करायची होती. संबंधित जमीन WCLच्या प्रकल्पात जाणार असल्याने नोकरी मिळण्याच्या प्रक्रियेसाठी ही कार्यवाही आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
याच कामासाठी भूमापक विशाल माडगीकर यांनी संबंधित शेतकऱ्याकडे २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच मागितल्याची तक्रार शेतकऱ्याने ACBकडे केली.
ACBने रचला सापळा
तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर पारशिवनी तहसील कार्यालय परिसरातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात सापळा रचण्यात आला.
गुरुवारी सायंकाळी सुमारे ६ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमापक विशाल माडगीकर यांना ACBच्या पथकाने रंगेहात पकडले.
पारशिवनी पोलिसांकडून पुढील तपास
या कारवाईनंतर संबंधित आरोपीविरुद्ध पारशिवनी पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पारशिवनी पोलीस करीत आहेत.
शासकीय कामासाठी नागरिकांकडून लाचेची मागणी केली जात असल्यास त्यांनी संबंधित यंत्रणेकडे तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.
ACBच्या या कारवाईमुळे पारशिवनीतील महसूल आणि भूमी अभिलेख विभागातील कामकाजावरही प्रश्न उपस्थित झाले असून, या प्रकरणाच्या पुढील तपासात आणखी काही बाबी समोर येतात का, याकडे लक्ष लागले आहे.
सिटी न्यूजसाठी अजय मेहरकुळे, रामटेक.



