भंडाऱ्यातील ४१ बाल वैज्ञानिकांचा ISRO अभ्यास दौरा यशस्वी; अंतराळ संशोधनाची घेतली प्रत्यक्ष माहिती

भंडारा | सिटी न्यूज
भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील तब्बल ४१ बाल वैज्ञानिकांनी ISRO, बेंगळुरू आणि अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनचा अभ्यास दौरा २०२६ यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, भंडारा यांच्या वतीने आयोजित ‘नवोन्मेष : बाल वैज्ञानिक सन्मान सोहळ्या’ अंतर्गत हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात विद्यार्थ्यांना प्रथमच विमान प्रवासाचा अनुभव मिळाला. त्याचबरोबर ISROमधील वैज्ञानिक आणि अंतराळ संशोधनाच्या कार्याची प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळाली.
‘Bhandara’s Young Innovators & Science Scholars’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, नवोन्मेषाची आवड आणि संशोधनाची प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
१४ ऑगस्ट रोजी अभ्यास दौऱ्याच्या पूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ४१ बाल वैज्ञानिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या ISRO दौऱ्यातील अनुभव उपस्थितांसमोर कथन करत भविष्यात विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात मोठं योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे राज्यमंत्री तथा वर्धा आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधनाची प्रत्यक्ष ओळख करून देणारा हा उपक्रम त्यांच्या भविष्यातील वैज्ञानिक वाटचालीला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
भंडाऱ्यातील या ४१ बाल वैज्ञानिकांच्या यशस्वी अभ्यास दौऱ्यामुळे विज्ञानाची आवड आणि संशोधनाची जिद्द असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.



