चिल्ड्रन एड सोसायटीच्या कामकाजाचा मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून आढावा

अतिक्रमण तातडीने हटवण्याचे निर्देश; रिक्त पदे, कर्मचारी प्रश्न आणि सुधारित आराखड्यावर बैठकीत चर्चा
मुंबई | प्रतिनिधी
चिल्ड्रन एड सोसायटीच्या २०२६-२७ या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात बैठक घेऊन सोसायटीच्या विविध कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सोसायटीच्या जागेवरील अतिक्रमण तातडीने हटवण्याचे निर्देश
चिल्ड्रन एड सोसायटीच्या मालकीच्या जागेवर असलेले अतिक्रमण तातडीने हटवण्याचे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तसेच उपलब्ध जागेचा विचार करून या ठिकाणी भविष्यात करण्यात येणाऱ्या विविध कामांचा सुधारित आराखडा सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
रिक्त पदे भरण्यावरही चर्चा
बैठकीत सोसायटीमधील रिक्त पदे भरण्याच्या मुद्द्यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्याबाबतही मंत्री तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
याशिवाय कार्यकारी समितीची बैठक घेणे आणि नवीन आकृतिबंधाचा प्रस्ताव सादर करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
माटुंगा कर्मचारी वसाहतीच्या जागेचा आढावा
माटुंगा येथील कर्मचारी वसाहतीतील जागेबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. उपलब्ध जागेचा योग्य वापर, सोसायटीच्या भविष्यातील गरजा आणि शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक विकासकामे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.
चिल्ड्रन एड सोसायटीच्या कामकाजात आवश्यक सुधारणा करून उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करण्यावर सरकारचा भर असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे.



