citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरातील जंगलात अनोळखी तरुणाचा मृतदेह; डोक्यात दगड घालून हत्येचा संशय

वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिम्बॉयसिस कॉलेज परिसरातील घटना; मृताची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे नागरिकांना आवाहन

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर शहरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिम्बॉयसिस कॉलेजच्या पाठीमागील जंगल परिसरात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे आहे. त्याने पांढऱ्या व ग्रे रंगाचा चौकडीचा फुलबाह्यांचा शर्ट परिधान केला होता. शर्टच्या कॉलरवर “SELECT” असे लिहिलेले आहे. तसेच त्याने निळ्या रंगाची जीन्स घातली असून तिच्या मागील खिशावर “DENIM” असे इंग्रजीत लिहिलेले आहे.

घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. प्राथमिक तपासात मृताच्या डोक्यावर गंभीर दुखापती आढळून आल्याने दगडाने वार करून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि पुढील तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, मृताची अद्याप ओळख पटलेली नसून, पोलिसांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. संबंधित तरुणाबाबत किंवा त्याच्या ओळखीबाबत कोणतीही माहिती असल्यास तातडीने वाठोडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या धक्कादायक घटनेमागील नेमके कारण काय आहे, मृत तरुणाची ओळख कधी पटणार आणि या प्रकरणातील आरोपींपर्यंत पोलिस कधी पोहोचणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून पुढील तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button