AmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

मनपा वर्धापन दिनानिमित्त 14 ऑगस्टला भव्य रक्तदान व सर्वसमावेशक आरोग्य शिबिर

महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त 14 ऑगस्ट रोजी शहरात भव्य रक्तदान शिबिर, रक्त तपासणी आणि सर्वसमावेशक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीत विविध तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

मनपाच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या बैठकीत रक्तदान शिबिराच्या नियोजनासंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. रक्तपेढ्यांशी समन्वय, रक्तदात्यांची नोंदणी, वैद्यकीय पथकांची नियुक्ती, रक्तसंकलनासाठी आवश्यक साहित्य, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता तसेच नागरिकांसाठी आरोग्य तपासणीची सुविधा याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले.

महापौर श्रीचंद तेजवानी यांनी शिबिरस्थळी येणाऱ्या नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रतीक्षागृह, स्वयंसेवक आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी त्यांनी “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान” असल्याचे नमूद करत अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्ण, थॅलेसेमिया आणि इतर रक्तविकारांनी ग्रस्त रुग्णांसाठी रक्ताचा सतत तुटवडा भासत असल्याने नागरिकांनी स्वेच्छेने मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन केले.

मोफत आरोग्य तपासणीमुळे अनेक गंभीर आजारांचे वेळेत निदान होण्यास मदत होते. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

या उपक्रमाची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी सामाजिक माध्यमे, प्रसारमाध्यमे, शैक्षणिक संस्था, व्यापारी संघटना आणि विविध मंडळांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

महापौरांनी विशेषतः महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील सफाई कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान आणि आरोग्य तपासणीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. त्यांच्या सहभागातून समाजात आरोग्य आणि रक्तदानाबाबत सकारात्मक संदेश जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीला उपमहापौर, स्थायी समितीचे पदाधिकारी, नगरसेवक, आरोग्य विभागाचे अधिकारी, मनपा कर्मचारी, सफाई कर्मचारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

14 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेले हे भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार असून, अमरावतीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदानाचा संदेश समाजात पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button