धावडा बसस्थानकाजवळ भरधाव आयशरची विद्युत डीपीला धडक; दोघे गंभीर जखमी, मोठी दुर्घटना थोडक्यात टळली

ऑटोला वाचवताना चालकाचा ताबा सुटला; महावितरणची तत्परता, डीपीजवळील दोघांचे प्राण थोडक्यात बचावले
भोकरदन | प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा बसस्थानक परिसरात गुरुवारी दुपारी भरधाव आयशर वाहनाचा भीषण अपघात झाला. समोर आलेल्या ऑटोला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने आयशर थेट महावितरणच्या विद्युत वितरण (डीपी) केंद्रावर जाऊन धडकले. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून, सुदैवाने डीपीजवळ उभे असलेले दोन नागरिक काही क्षणांपूर्वीच बाजूला झाल्याने मोठी जीवितहानी टळली.
माहितीनुसार, एमएच-१९-५७५७ क्रमांकाचे आयशर वाहन भरधाव वेगाने धावडा बसस्थानकाच्या दिशेने येत होते. त्याचवेळी समोर अचानक एक ऑटो आल्याने चालकाने वाहन वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाचा ताबा सुटला आणि आयशर थेट महावितरणच्या विद्युत डीपीवर जाऊन आदळले.
धडक इतकी भीषण होती की आयशरच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात वाहनचालक आणि वाहनमालक सुभाष पाटील तसेच किन्नर रवींद्र आंबेकर हे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत दोघांना वाहनातून बाहेर काढले आणि अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
अपघाताच्या वेळी विद्युत डीपीजवळ दोन नागरिक उभे होते. मात्र, धडक होण्याच्या काही क्षणांपूर्वीच ते तेथून बाजूला झाल्याने त्यांचे प्राण वाचले. अन्यथा या अपघातात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.
अपघातामुळे महावितरणच्या विद्युत डीपीचे मोठे नुकसान झाले. संभाव्य विद्युत अपघाताचा धोका लक्षात घेऊन महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्वरित वीजपुरवठा बंद करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांच्या तत्परतेमुळे आणखी मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच पारध पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताचे नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या अपघातानंतर धावडा बसस्थानक परिसरात स्पीड ब्रेकर, वेगमर्यादा दर्शविणारे फलक आणि वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांनी पुन्हा एकदा केली आहे. वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.



