अमरावती एमडी ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई; राजस्थानातून मुख्य पुरवठादाराला अटक

२७७ ग्रॅम एमडी जप्ती प्रकरणाचा तपास राजस्थानपर्यंत; ड्रग्ज नेटवर्क उघड करण्यासाठी पोलिसांचा सखोल तपास
अमरावती | प्रतिनिधी
अमरावतीतील २७७ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) जप्ती प्रकरणात राजापेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत ड्रग्जच्या मुख्य पुरवठादाराला राजस्थानातून अटक केली आहे. आरोपी साहिल मेहरा याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राजस्थानातील जालोर जिल्ह्यात सापळा रचून रामनिवास बिश्नोई याला ताब्यात घेतले. या कारवाईनंतर ड्रग्ज पुरवठा साखळीचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती आणखी वाढवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२६ रोजी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकोली परिसरातील साई हेरिटेज भागातून साहिल मेहरा याच्या ताब्यातून २७७ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आली होती. त्यानंतर २ ऑगस्ट रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केल्यानंतर तपासाला वेग आला.
पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान साहिल मेहराने ही एमडी राजस्थानातील एका व्यक्तीकडून आणल्याची माहिती दिली. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार राजापेठ पोलिसांचे विशेष पथक तातडीने राजस्थानला रवाना झाले.
राजस्थानातील जालोर जिल्ह्यातील राणीवाडा येथे सापळा रचून पोलिसांनी रामनिवास बिश्नोई याला अटक केली. प्राथमिक चौकशीत रामनिवास बिश्नोई याने यापूर्वीही दोन ते तीन वेळा साहिल मेहराला एमडीचा पुरवठा केल्याची माहिती समोर आली आहे.
तपासादरम्यान आणखी एका संशयित पुरवठादाराचे नावही समोर आले. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता तो फरार असल्याचे आढळले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध सुरू असून, प्राथमिक माहितीनुसार हा संशयित थेट फॅक्टरीमधून ड्रग्ज आणून रामनिवास बिश्नोईकडे पोहोचवत असल्याचा संशय आहे.
रामनिवास बिश्नोई याला अमरावतीत आणण्यात आले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी आता ड्रग्जच्या फॉरवर्ड लिंकवर लक्ष केंद्रित केले आहे. साहिल मेहरा अमरावतीत कोणाला ड्रग्ज पुरवत होता, त्याच्याशी संबंधित पेडलर कोण आहेत आणि वितरणाचे जाळे किती मोठे आहे, याचा तपास सुरू आहे.
या तपासासाठी साहिल मेहराचा मोबाईल फोन, व्हॉट्सअॅप चॅट, ऑडिओ रेकॉर्डिंग तसेच इतर डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. या माध्यमातून ड्रग्ज रॅकेटमधील इतर संबंधितांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ही संपूर्ण कारवाई राजापेठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून, शहरातील ड्रग्ज नेटवर्कचा संपूर्ण पर्दाफाश करण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी काही संशयित पोलिसांच्या रडारवर असून, लवकरच आणखी अटक होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.



