citynewsLatest NewsMaharashtraWashim

कामरगावातील आरोग्यविषयक प्रश्नांची प्रशासनाने घेतली दखल; अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी

शाळा, हॉटेल्स आणि चहाच्या टपऱ्यांची पाहणी; स्वच्छता, अन्नसुरक्षा आणि एफएसएसएआय नियमांबाबत कठोर सूचना

वाशिम | प्रतिनिधी

कामरगावातील अस्वच्छता, खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित मुद्दे समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने गावात विशेष तपासणी मोहीम राबवली. दिवसभर चाललेल्या या कारवाईत शाळा, हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या आणि खाद्य व्यावसायिकांची तपासणी करण्यात आली. तसेच अन्नसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला.

अन्न व औषध प्रशासनाच्या वाशिम पथकाने सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण आणि अन्न सुरक्षा अधिकारी के. जी. बरडे यांच्या उपस्थितीत ही तपासणी केली. या मोहिमेत जिल्हा परिषद शाळा, पीएमसी शाळा तसेच शाळांच्या परिसरातील हॉटेल्स आणि चहाच्या टपऱ्यांची पाहणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या खिचडीची गुणवत्ता, स्वयंपाकघरातील स्वच्छता, अन्न साठवणुकीची व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करत प्रत्येक शाळेत फिल्टरयुक्त पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या.

हॉटेल चालक आणि खाद्य व्यावसायिकांना अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाचा (FSSAI) परवाना तातडीने घेण्याचे निर्देश देण्यात आले. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला.

या दौऱ्यात कामरगाव सर्कलमधील सुमारे २० ते २५ मुख्याध्यापकांशी अधिकाऱ्यांनी संवाद साधला. अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक उपाययोजनांबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाचे मुख्याध्यापकांनी स्वागत करत प्रशासनाच्या पुढाकाराचे कौतुक केले.

या तपासणी मोहिमेनंतर गावातील पालक आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, येत्या काळात या सूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button