AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

सिटी न्यूजच्या बातमीचा सकारात्मक परिणाम; बडनेरा मोदी हॉस्पिटलमध्ये अँटी व्हेनम इंजेक्शन उपलब्ध

सर्पदंशावरील उपचारासाठी नागरिकांना मोठा दिलासा; आरोग्य प्रशासनाने घेतली तातडीची दखल

अमरावती | प्रतिनिधी

बडनेरा येथील ट्रॉमा केअर मोदी हॉस्पिटलमध्ये सर्पदंशावरील अँटी व्हेनम इंजेक्शन उपलब्ध नसल्याचा प्रश्न प्रसारमाध्यमांमधून समोर आल्यानंतर आरोग्य प्रशासनाने त्याची दखल घेत संबंधित रुग्णालयात अँटी व्हेनम इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहे. या निर्णयामुळे बडनेरा आणि परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, आपत्कालीन परिस्थितीत वेळेत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यापूर्वी मोदी हॉस्पिटलमध्ये सर्पदंशावरील अँटी व्हेनम इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना उपचारासाठी अमरावती शहरात जावे लागत होते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत उपचार मिळण्यास विलंब होत असल्याची बाब समोर आली होती.

या प्रश्नाकडे लक्ष वेधल्यानंतर आरोग्य प्रशासनाने तातडीने आवश्यक कार्यवाही करत मोदी हॉस्पिटलमध्ये अँटी व्हेनम इंजेक्शन उपलब्ध करून दिले. या निर्णयाचे स्वागत करत सर्प मित्र संघटनेच्या वतीने डॉ. इमरान शाह आणि डॉ. जितेंद्र राजकुमार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आरोग्य प्रशासनाचे आभारही व्यक्त करण्यात आले.

यावेळी नगरसेवक अजय जयस्वाल, सामाजिक कार्यकर्ते मनोज गजभिये, सिद्धार्थ बनसोड, सुशील बोरकर, सर्प मित्र संघटनेचे अध्यक्ष हीरा अण्णा स्वामी, राहुल वानखेडे, ऋतिक ढोके तसेच संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सर्प मित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या निर्णयामुळे बडनेरा आणि परिसरातील नागरिकांना सर्पदंशानंतर उपचारासाठी अमरावतीपर्यंत धाव घ्यावी लागणार नाही. वेळेत उपचार उपलब्ध झाल्यास अनेक रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी डॉ. इमरान शाह यांनी या सुविधेमुळे रुग्णांना मोठा लाभ होणार असल्याचे सांगितले. तसेच नगरसेवक अजय जयस्वाल यांनी नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल आरोग्य प्रशासनाचे आभार मानले.

नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर वेळेवर दखल घेऊन उपाययोजना होणे ही सकारात्मक बाब असून, या निर्णयामुळे बडनेरा परिसरातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button