citynewsLatest NewsMaharashtraNanded

मसलगा जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकादायक; ३७ विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

छताला गळती, स्लॅबला भेगा; मुख्याध्यापकांच्या निवेदनानंतरही दुरुस्ती नाही, पालकांमध्ये संताप

नांदेड | प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील मसलगा येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत असून, पहिली ते पाचवीतील ३७ विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेच्या छताला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून स्लॅबला पडलेल्या भेगांमुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत असल्याचे समोर आले आहे.

माहितीनुसार, शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असून अध्यापनावरही त्याचा परिणाम होत आहे. यापूर्वी शाळेच्या व्हरांड्यातील स्लॅबचा काही भाग कोसळला असून उर्वरित भागही कधीही कोसळण्याची भीती शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

शाळेतील धोकादायक परिस्थितीची माहिती मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात दिली आहे. मात्र, अद्याप शाळेची दुरुस्ती किंवा विद्यार्थ्यांसाठी पर्यायी सुरक्षित व्यवस्था करण्यात आलेली नसल्याची माहिती आहे.

या पार्श्वभूमीवर पालक आणि ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच तातडीने शाळेची दुरुस्ती करावी किंवा विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मतही स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button