AmravatiamravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

शाळेजवळ दारूचे दुकान असल्याचा आरोप; अमरावतीत पालक आणि शाळा प्रशासनाची कारवाईची मागणी

व्ही.एम.व्ही. परिसरातील अरुणोदय इंग्लिश स्कूलपासून अवघ्या ५० मीटरवर मद्यविक्री केंद्र असल्याचा दावा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता

अमरावती | प्रतिनिधी

अमरावतीच्या व्ही.एम.व्ही. परिसरातील अरुणोदय इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या अगदी जवळ दारूचे दुकान सुरू असल्याचा आरोप करत पालक आणि शाळा प्रशासनाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शाळेपासून अवघ्या ५० मीटर अंतरावर मद्यविक्री केंद्र असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर आणि शैक्षणिक वातावरणावर परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला असून, संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

व्ही.एम.व्ही. परिसरातील हर्षराज कॉलनी येथे असलेल्या अरुणोदय इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या परिसरात हे दारूचे दुकान असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या परिसरातून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची ये-जा होत असल्याने पालकांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

देशभरात व्यसनमुक्त भारत अभियान राबविले जात असताना शैक्षणिक संस्थेच्या जवळ मद्यविक्री केंद्र सुरू असणे ही चिंतेची बाब असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, अशीही भीती व्यक्त करण्यात आली आहे.

शाळा व्यवस्थापनानेही पालकांकडून सातत्याने याबाबत तक्रारी आणि प्रश्न उपस्थित होत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन नियमांनुसार आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित प्रशासन किंवा दारू दुकान व्यवस्थापनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे पालक आणि शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button