ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित; बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल, 150 हून अधिक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक
कोल्हापूर: ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि बिहार, त्रिपुरा तसेच पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे मंगळवारी कोल्हापूर येथे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी 2009 ते 2013 या कालावधीत त्रिपुराचे राज्यपाल, 2013 ते 2014 या काळात बिहारचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. तसेच 2014 मध्ये पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला होता.
1991 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी स्थापन केलेल्या डी. वाय. पाटील समूहाच्या माध्यमातून मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि कोल्हापूरसह देशभरात 150 हून अधिक शैक्षणिक संस्था आणि अभिमत विद्यापीठे उभी राहिली.
22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर येथे जन्मलेल्या डॉ. पाटील यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात महाराष्ट्रातील आमदार म्हणून केली. त्यानंतर त्यांनी शिक्षण आणि समाजसेवेला वाहून घेतले. 2018 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. यापूर्वी ते काँग्रेसशीही संबंधित होते.
त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांनी त्यांना “शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले शिल्पकार” असे संबोधत श्रद्धांजली अर्पण केली. तर त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनीही त्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेतील योगदानाचे स्मरण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या अंत्यसंस्काराबाबतची अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.



