गिट्टीखदान खुनाच्या प्रयत्नातील मुख्य आरोपी पुन्हा जेरबंद; नागपूर पोलिसांची संयुक्त कारवाई

पोलिसांच्या ताब्यातून निसटलेल्या आशिष विल्सनला सीताबर्डीतील मुंजे चौकातून पुन्हा अटक; पुढील तपास सुरू
नागपूर | प्रतिनिधी
नागपूरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या प्रयत्नाच्या गाजलेल्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांच्या ताब्यातून निसटलेला मुख्य आरोपी आशिष विल्सन याला गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ आणि गिट्टीखदान पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पुन्हा अटक करण्यात आली आहे. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी गिट्टीखदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादी शनिचंद्रिकापुरे यांच्यावर झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात मुख्य आरोपी आशिष विल्सन, यश विल्सन आणि इतर पाच ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ कडून सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी विक्की कुंभार उर्फ पंकज महतो (वय २१ वर्षे) आणि अनिकेत उर्फ अंकित प्रमोद जनबंधू (वय २५ वर्षे) या दोन आरोपींना ताब्यात घेऊन गिट्टीखदान पोलिसांच्या स्वाधीन केले.
यानंतर मुख्य आरोपी आशिष विल्सनचा शोध सुरू असताना तो शस्त्रासह आढळून आला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला गिट्टीखदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, आरोपी पोलिसांच्या ताब्यातून निसटल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ आणि गिट्टीखदान पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम हाती घेतली. या शोधमोहीमेदरम्यान शनिवारी सीताबर्डीतील मुंजे चौक परिसरातून मुख्य आरोपी आशिष विल्सन याला पुन्हा ताब्यात घेण्यात यश आले.
आरोपीला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ चे अधिकारी चेतन बोरखेडे आणि त्यांच्या पथकाने गिट्टीखदान पोलिसांच्या संयुक्त सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडली.



