छत्रपती संभाजीनगरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात; वकील संरक्षण कायद्यावर मार्गदर्शन, गुरु-शिष्य सत्कार सोहळा संपन्न

मराठवाडा शिवजयंती वकील संघाच्या वतीने आयोजन; विधिज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि वकील बांधवांची मोठी उपस्थिती
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच वकील संरक्षण कायद्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथील तापडे नाट्यगृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मराठवाडा शिवजयंती वकील संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात गुरु-शिष्य सत्कार सोहळाही पार पडला. विधिज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, वकील आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. बी. वाय. वंजारे होते. स्वागताध्यक्ष म्हणून ॲड. कमलाकर सूर्यवंशी, तर मार्गदर्शक म्हणून ॲड. निलेश घाणेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच वकील संरक्षण कायद्याची आवश्यकता, न्यायव्यवस्थेतील वकिलांची भूमिका आणि कायद्याविषयी जनजागृती यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान रविराज साबळे पाटील, नामदेव मिसाळ आणि सागर पगारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच उच्च न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एस. के. कदम, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अशोक मुळे यांच्यासह संभाजीनगर आणि मराठवाड्यातील अनेक ज्येष्ठ विधिज्ञ, वकील आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन ॲड. दत्ता हूड पाटील, ॲड. आदेश वटाणे, ॲड. अनंता मगर, ॲड. प्रकाशराजे गायकवाड आणि ॲड. पार्थ साळुंके यांनी केले.
यावेळी वकिली क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नेहा राजाराम माळी यांच्या कार्याचाही गौरव करण्यात आला. वकिली व्यवसायात कार्यरत असतानाही सातत्यपूर्ण अभ्यास, व्यावसायिक कौशल्य आणि विविध क्षेत्रांतील गुणवत्ता यांचा समतोल साधत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, सामाजिक न्यायाची जाणीव बळकट करणे आणि वकिलांच्या हक्कांबाबत जनजागृती करणे, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.



