‘ऑपरेशन कवच’ची मोठी कारवाई; अमरावती ग्रामीण पोलिसांनी २०.८६९ किलो गांजा जप्त

₹१०.४३ लाखांचा अंमली पदार्थ जप्त; महिला व पुरुष अटकेत, एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत मोठी धडक कारवाई करत लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २० किलो ८६९ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत १० लाख ४३ हजार ४५० रुपये असून, या प्रकरणी एका महिला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन कवच’ मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वाखालील पथक लोणी टाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, बडनेरा-लोणी रोडवरील श्री संत सखाराम महाराज देवस्थानाजवळ एक पुरुष आणि एक महिला गांजाची वाहतूक करण्यासाठी येणार आहेत.
माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंच, फॉरेन्सिक पथक आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यासह घटनास्थळी सापळा रचला. संशयित व्यक्ती घटनास्थळी आल्यानंतर त्यांच्या ताब्यातील नायलॉनच्या गोणीची पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान गोणीत २० किलो ८६९ ग्रॅम गांजा आढळून आला.
या कारवाईत सुधीर बुधाजी फुलमाळी (वय ३६, रा. आनंदनगर, वर्धा) आणि कांता रणजीत लोंगबरसे (वय २८, रा. पुलफैल, वर्धा) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत १० लाख ४३ हजार ४५० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त केलेला गांजा कुठून आणण्यात आला होता, तो कुठे विक्रीसाठी नेण्यात येत होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी अंमली पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, विक्री आणि सेवन याविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबल्याचे स्पष्ट केले असून, अशा प्रकारच्या धडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे.



