बेलतरोडी पोलिसांच्या सतर्कतेने टळली दुर्घटना; दीड वर्षांच्या चिमुकलीसह घर सोडलेल्या व्यक्तीचा एका तासात शोध

कौटुंबिक वादानंतर आत्महत्येच्या उद्देशाने निघाला होता; समुपदेशनानंतर कुटुंबाच्या स्वाधीन
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या बीट मार्शलच्या सतर्कता आणि तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली. कौटुंबिक वादानंतर दीड वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन आत्महत्येच्या उद्देशाने घराबाहेर पडलेल्या व्यक्तीचा पोलिसांनी अवघ्या एका तासात शोध घेत त्याला आणि चिमुकलीला सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर समुपदेशन करून दोघांनाही कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलतरोडी पोलीस ठाण्याचे बीट मार्शल भूषण आणि अतुल हे नियमित गस्त घालत असताना त्यांच्या बीटमधील पंचिंग पॉईंटजवळ एका महिलेने त्यांच्याकडे धाव घेत मदत मागितली. पती-पत्नीमध्ये झालेल्या वादानंतर तिचा पती दीड वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन आत्महत्येच्या उद्देशाने घरातून निघून गेल्याची माहिती तिने पोलिसांना दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बीट मार्शलने तातडीने शोधमोहीम सुरू केली. परिसरात विविध ठिकाणी शोध घेतल्यानंतर जवळपास एका तासाच्या अथक प्रयत्नांनंतर संबंधित व्यक्ती आणि त्याच्यासोबत असलेली दीड वर्षांची चिमुकली सुरक्षित अवस्थेत आढळून आली.
यानंतर पोलिसांनी दोघांनाही सुरक्षित ताब्यात घेऊन त्यांचे समुपदेशन केले. समुपदेशनानंतर संबंधित व्यक्ती आणि चिमुकलीला त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. त्यामुळे एका कुटुंबावर ओढवणारे मोठे संकट वेळेवर टळले.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित पती-पत्नी हे दोघेही बांधकाम क्षेत्रात मजुरीचे काम करतात. कौटुंबिक वाद आणि गैरसमजातून संबंधित व्यक्तीने हे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
वेळीच मिळालेली माहिती, तातडीने राबविण्यात आलेली शोधमोहीम आणि संवेदनशील समुपदेशनामुळे संभाव्य अनर्थ टळला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या बीट मार्शलच्या या कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत असून, पोलिसांच्या संवेदनशील आणि मानवतावादी भूमिकेचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.



