छिंदवाडा–नागपूर रेल्वेमार्गावर दुर्दैवी अपघात; रेल्वेच्या धडकेत ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुरजगाव येथे घटना; अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्यातील केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुरजगाव परिसरात छिंदवाडा–नागपूर रेल्वेमार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघातात ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास केळवद पोलीस करत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ४.४५ वाजण्याच्या सुमारास छिंदवाडाहून नागपूरकडे येणाऱ्या रेल्वेची धडक लागून मन्नूलाल रामाजी उईके (वय ५०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी केळवद पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आवश्यक कायदेशीर कार्यवाही सुरू केली.
प्राथमिक तपासात रेल्वेची धडक नेमक्या कोणत्या परिस्थितीत बसली, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नसून सर्व शक्यतांचा तपास केला जात आहे. मृतदेह सावनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला.
दरम्यान, हितज्योती आधार फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी मृतदेह रेल्वेमार्गावरून बाहेर काढण्यासाठी मोलाची मदत केली. तसेच केळवद पोलीस आणि स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी आवश्यक सहकार्य केले.
या दुर्दैवी घटनेमुळे खुरजगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघातामागील नेमके कारण शोधण्यासाठी केळवद पोलीस सखोल तपास करत आहेत.



