citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

‘लुटेरी दुल्हन’ टोळीचा नागपुरात पर्दाफाश; मुख्य महिला सूत्रधार अटकेत

लग्नाचे आमिष दाखवून गुजरातमधील तरुणाची लाखोंची फसवणूक; बनावट वधूनंतर मुख्य आरोपीलाही पोलिसांनी जेरबंद केले

नागपूर | प्रतिनिधी

लग्नाचे आमिष दाखवून गुजरातमधील एका तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या कथित ‘लुटेरी दुल्हन’ टोळीचा नागपूर शहरातील तहसील पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य महिला सूत्रधार राणी उर्फ कोमल जितेंद्र पांडे हिला अटक करण्यात आली असून, यापूर्वी कथित बनावट वधू नम्रता मालवीय हिलाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या कारवाईमुळे लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचे जाळे उघडकीस आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील भावनगर येथील आकाश पारेख यांचे लग्न जुळत नसल्याने ते मित्राच्या सल्ल्यानुसार नागपूर येथे आले होते. यावेळी मुख्य आरोपी कोमल पांडे हिने त्यांची भेट घेऊन नम्रता मालवीय हिच्याशी ओळख करून दिली आणि विवाहाचे आमिष दाखवले.

त्यानंतर मुलीचे घर दाखविण्याच्या बहाण्याने आकाश पारेख यांना कोराडी परिसरात नेण्यात आले. त्याच दिवशी विवाह लावून देण्याचे सांगत आरोपींनी त्यांच्याकडून एटीएममधून ७० हजार रुपये रोख काढून घेतले. तसेच सोन्याचे दागिनेही घेतल्याचा आरोप आहे.

यानंतर विवाहासाठी त्यांना बर्डी परिसरात नेण्यात आले. मात्र, तेथे अचानक नम्रता मालवीयचा कथित पती आला आणि ती आपली पत्नी असल्याचा दावा करत गोंधळ घातला. या गोंधळाचा फायदा घेत आरोपी रोख रक्कम आणि दागिने घेऊन घटनास्थळावरून पसार झाल्याचे तपासात समोर आले आहे.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडिताने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पाचपावली परिसरातून मुख्य आरोपी कोमल पांडे हिला अटक केली. यापूर्वी या प्रकरणातील कथित बनावट वधू नम्रता मालवीय हिला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

या प्रकरणात आणखी काही आरोपी सहभागी आहेत का, फसवणुकीचे असे इतर गुन्हे या टोळीने केले आहेत का, याचा तपास तहसील पोलीस करत आहेत. नागरिकांनी विवाहाच्या नावाखाली येणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या आमिषांना बळी न पडता आवश्यक पडताळणी करूनच आर्थिक व्यवहार करावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button