धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJPच्या नव्या मागण्या; ‘भारत अजूनही उत्तराची वाट पाहतोय’

विद्यार्थ्यांच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ₹1 कोटी भरपाई, विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची आणि दिल्ली पोलिसांकडून सार्वजनिक माफीची मागणी
नवी दिल्ली | प्रतिनिधी
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने आपली लढाई अद्याप संपलेली नसल्याचे स्पष्ट करत केंद्र सरकारसमोर आणखी तीन महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत.
CJPचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे, मात्र आमच्या आणखी काही महत्त्वाच्या मागण्या प्रलंबित आहेत. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ₹1 कोटींची आर्थिक मदत द्यावी.”
याशिवाय, २० जुलै रोजी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली. तसेच २० जुलैनंतर विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणीही CJPने केली आहे.
यानंतर CJPने आपल्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावर सुधारित मागण्यांची यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) आणि दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांची सार्वजनिक माफी मागावी, ही नवीन मागणीही समाविष्ट करण्यात आली आहे.
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले हे आंदोलन सुरुवातीला शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मागणीसाठी सुरू झाले होते. त्यानंतर बेरोजगारी, सरकारी उत्तरदायित्व आणि आर्थिक संधी यांसारख्या मुद्द्यांचाही त्यामध्ये समावेश झाला.
दरम्यान, २० जुलै रोजी संसदेकडे निघालेल्या आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा आरोप करण्यात आला, ज्यामुळे आंदोलन अधिक तीव्र झाले.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही CJPने आपल्या उर्वरित मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचे संकेत दिले असून, आता केंद्र सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे देशाचे लक्ष लागले आहे.



