कल्याणमध्ये देहव्यापार रॅकेटवर मकोकाअंतर्गत मोठी कारवाई

मुख्य सूत्रधारासह आठ आरोपी अटकेत; 20 पीडित महिलांची सुटका, मानव तस्करीविरोधातील पोलिसांची मोठी मोहीम
कल्याण | प्रतिनिधी
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सुरू असलेल्या कथित संघटित देहव्यापार रॅकेटवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत मोठी कारवाई करत मुख्य सूत्रधारासह एकूण आठ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईदरम्यान 20 पीडित महिलांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून, संघटित गुन्हेगारी आणि मानव तस्करीविरोधातील ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 फेब्रुवारी 2026 रोजी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान या रॅकेटचा पर्दाफाश झाला. तपासात आरोपींनी संघटित टोळी तयार करून महिलांना पैशांचे आमिष दाखवून तसेच दबाव टाकून देहव्यापारात ढकलल्याचे उघड झाले.
ग्राहकांपर्यंत महिलांना पोहोचवून आरोपी मोठ्या प्रमाणात अवैध आर्थिक लाभ मिळवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच आरोपींकडे उत्पन्नाचे कोणतेही वैध साधन नसल्याचे आढळून आल्याने या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील (मकोका) संबंधित कलमांची भर घालण्यात आली.
तपासादरम्यान यापूर्वी अटक करण्यात आलेल्या महिला आरोपींची पुन्हा चौकशी करण्यात आली. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार फरार आरोपी प्रशांत उर्फ कवा गायकवाड याला अटक करण्यात आली.
यानंतर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, या रॅकेटचा कथित मुख्य सूत्रधार तौफिक उर्फ टोप्या सैयद आणि फरार महिला आरोपी मीता बारिक हे पश्चिम बंगालमध्ये लपून बसल्याचे समोर आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विशेष तपास पथक पश्चिम बंगालमध्ये रवाना झाले. तेथील दक्षिण परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर पोलिसांच्या सहकार्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आणि ट्रान्झिट वॉरंटवर कल्याण येथे आणण्यात आले.
मंगळवारी सर्व आरोपींना विशेष मकोका न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 18 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे रॅकेटमधील मुख्य सूत्रधारासह सर्व आठ आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असून, 20 पीडित महिलांची सुरक्षित सुटका करण्यात यश आले आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून मानव तस्करी, आर्थिक व्यवहार आणि रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींचा सहभाग याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.



