citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrimeWardha

सावळापूर घाटात पोलिसांची धाडसी कारवाई; 13.64 लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त

दोन ट्रॅक्टर आडवे लावून संशयित वाहन अडवले; दोन आरोपी ताब्यात

वर्धा | प्रतिनिधी

वर्धा जिल्ह्यातील दारूबंदीला हरताळ फासण्याचा प्रयत्न करणाऱ्या मद्यतस्करांविरोधात आर्वी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सावळापूर घाट परिसरात सिनेस्टाईल पाठलाग करून दोन ट्रॅक्टर रस्त्यात आडवे लावत संशयित वाहन अडवण्यात आले. या कारवाईत १३ लाख ६४ हजार रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात विदेशी मद्याची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती आर्वी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयित वाहनावर नजर ठेवत सापळा रचला.

दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच वाहनचालकाने वाहन न थांबवता पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग सुरू केला. संशयित वाहनाला अडवण्यासाठी सावळापूर घाट परिसरात दोन ट्रॅक्टर रस्त्यावर आडवे उभे करण्यात आले. या नियोजनबद्ध कारवाईमुळे वाहन थांबवण्यात पोलिसांना यश आले.

वाहनाची तपासणी केली असता विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या ३० पेट्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या मद्याची एकूण किंमत १३ लाख ६४ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी शेख वसीम शेख सत्तार आणि शेख वसीम अब्दुल सत्तार या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

विशेष म्हणजे, दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी विदेशी मद्याविरोधातील ही मोठी कारवाई ठरली आहे. त्यामुळे अवैध मद्यतस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी अशा कारवाया अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि पोलीस उपअधीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश डेहनकर यांच्या नेतृत्वात पार पडली. या प्रकरणाचा पुढील तपास आर्वी पोलीस करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button