रामटेकमध्ये दुर्दैवी घटना; बंधाऱ्यात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू

वाघाच्या भीतीने उडी घेतल्याची चर्चा; वनविभागाकडून घटनेचा तपास सुरू
रामटेक (नागपूर) | प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार वनपरिक्षेत्रातील छवारी शिवारात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत पिता आणि सात वर्षीय मुलाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, वाघाच्या भीतीमुळे त्यांनी बंधाऱ्यात उडी घेतल्याची चर्चा असली, तरी या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नसून वनविभागाकडून सर्व बाबींचा तपास सुरू आहे.
मृतांची ओळख जीवन धर्मराज कोकोडे (वय ३५) आणि त्यांचा मुलगा जतिन जीवन कोकोडे (वय ७) अशी झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जीवन कोकोडे हे रविवारी सकाळी आपल्या मुलासह लखन बंधाऱ्याजवळ मासेमारीसाठी गेले होते. त्याचवेळी वाघ येत असल्याची चाहूल लागल्याने त्यांनी घाबरून मुलाला कवेत घेत बंधाऱ्यात उडी घेतल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, बंधाऱ्यातील खोल चिखल आणि पाण्यात अडकल्याने दोघांनाही बाहेर पडता आले नाही. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. शोधमोहीमेदरम्यान सात वर्षीय जतिनचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला, तर जीवन कोकोडे यांचा मृतदेह नंतर बाहेर काढण्यात आला.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.
वनविभागाने घटनास्थळाची पाहणी सुरू केली असून, त्या वेळी प्रत्यक्षात वाघाची उपस्थिती होती का, अथवा या घटनेमागे अन्य काही कारण होते का, याचा तपास सुरू आहे. संबंधित अहवालानंतरच घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
जंगलालगतच्या गावांमध्ये वन्यप्राण्यांच्या हालचालींबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून स्थानिकांनी अधिक प्रभावी सुरक्षा उपाययोजना, नियमित गस्त आणि नागरिकांना वेळेवर सूचना देण्याची मागणी केली आहे.



