BuldhanacitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrime

मेहकर पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दोन सराईत आरोपी अटकेत

धारदार शस्त्रे, मोबाईल आणि कारसह २.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त; एक आरोपी फरार

बुलढाणा | प्रतिनिधी

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धाडसी कारवाई करत लाल रंगाच्या कारचा पाठलाग करून दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत धारदार शस्त्रे, मोबाईल फोन आणि कारसह २ लाख ६६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष कोंबिंग ऑपरेशन सुरू केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोक्का कारवाईतील तसेच रेकॉर्डवरील काही गुन्हेगार लाल रंगाच्या कारमधून मेहकर शहराच्या दिशेने येत असल्याची गोपनीय माहिती मेहकर पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांनी तातडीने पोलिस पथकांना सतर्क केले.

रिसोड–सोनाटी मार्गावर एमएच-३१ एफए-५८२० क्रमांकाची लाल रंगाची डॅटसन रेडी-गो कार पोलिसांच्या नजरेस पडली. कारच्या मागील काचेवर ‘जगदंबा’ असे लिहिलेले होते. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिला. मात्र चालकाने आदेश न पाळता भरधाव वेगाने कार बायपास मार्गे सारंगपूर–बरटाळा फाट्याच्या दिशेने पळवली.

यानंतर पोलिसांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला. अखेर गणपूर फाट्याजवळ शिताफीने कार अडविण्यात पोलिसांना यश आले. कार थांबताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला, तर दोन आरोपींना पाठलाग करून पोलिसांनी ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अमोल करत्या भोसले (वय २५, रा. बरटाळा) आणि अजय दहिमल भोसले (रा. वरवंडा) अशी आहेत.

पंचांसमक्ष करण्यात आलेल्या झडतीत कारमधून धारदार सुरे, चाकू, ऑटोमॅटिक चाकू, लाकडी मुठीची शस्त्रे, रेडमी नोट १३ ५जी मोबाईल फोन तसेच लाल रंगाची डॅटसन रेडी-गो कार जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ६६ हजार ८५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

फरार आरोपीच्या शोधासाठी कर्पूर, उपळी आणि सुकळी परिसरात विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले असून शोधमोहीम सुरू आहे.

दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार अटक करण्यात आलेला अमोल भोसले हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध बुलढाणासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये खूनाचा प्रयत्न, आर्म्स अॅक्ट, चोरी आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

मेहकर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button