महाराष्ट्रात पावसाचा कहर; नद्या दुथडी भरून वाहिल्या, अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती

गोदावरी, पंचगंगा, इंद्रायणी आणि वारणा नद्यांना पूर; धरणांमधून विसर्ग सुरू, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
मुंबई | प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे, कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीची पाणीपातळी धोक्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे, तर पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. अनेक धरणांतील पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून प्रशासनाने नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नाशिक जिल्ह्यात हवामान विभागाच्या रेड अलर्टनंतर रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून रामकुंड परिसर जलमय झाला आहे. कळवण आणि सुरगाणा तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे चाणकापूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून मालेगावमधून वाहणाऱ्या गिरणा नदीलाही पूर आला आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी सुमारे ३५ फूट इतकी पोहोचली आहे. जिल्ह्यातील ५६ बंधारे पाण्याखाली गेले असून जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राधानगरी धरण सुमारे ५१ टक्के, तर दूधगंगा धरण २१ टक्के भरले असून पाणलोट क्षेत्रात अद्यापही मुसळधार पाऊस सुरू आहे.
सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात ११८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे वारणा नदी पात्राबाहेर वाहू लागली असून नदीकाठच्या शेतीला धोका निर्माण झाला आहे. कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध दत्त मंदिरातही पुराचे पाणी शिरले आहे.
दरम्यान, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिर परिसरालाही पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे. डोंगरातून वेगाने वाहणारे पाणी मंदिर परिसरात आल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला आहे.
पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरण सुमारे ८० टक्के भरले असून मुठा नदीपात्रात ५०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
देवाची आळंदी येथे इंद्रायणी नदीला महापूर आल्याने नदीवरील चारही प्रमुख पूल पाण्याखाली गेले आहेत. पूरस्थितीमुळे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव मोजक्याच वारकऱ्यांना प्रवेश देण्यात येत आहे.
विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातही गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून घरे व गोठ्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, हवामान विभागाने नाशिक, पुणे, मुंबई आणि उपनगरांसाठी ऑरेंज अलर्ट, तर पालघर आणि ठाणे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन दिवसांनंतर पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असली, तरी नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



