BuldhanacitynewsLatest NewsMaharashtra

मुसळधार पावसाने सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेच्या दोन वर्गखोल्या कोसळल्या

सुट्टी असल्याने मोठी दुर्घटना टळली; दोन वर्षांपासून तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा गावकऱ्यांचा आरोप

बुलढाणा | प्रतिनिधी

शासनाकडून शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विविध योजना राबविल्या जात असताना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेची अत्यंत धक्कादायक अवस्था समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे शाळेच्या दोन वर्गखोल्या कोसळल्याने शाळेच्या इमारतीच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुदैवाने घटना घडली त्यावेळी शाळेला सुट्टी असल्याने मोठी जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे शाळेच्या इमारतीची एक भिंत पूर्णपणे कोसळली असून छताचा स्लॅब तुटून लोंबकळत आहे. वर्गखोल्यांमध्ये विटा, माती आणि बांधकाम साहित्याचा मोठा ढिगारा साचल्याने संपूर्ण इमारत धोकादायक बनली आहे.

या घटनेत शाळेजवळ खेळत असलेल्या एका मुलाच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, शाळेला सुट्टी असल्याने विद्यार्थी वर्गखोल्यांमध्ये नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

गावकऱ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की, २०२४ पासून शाळेची इमारत धोकादायक झाल्याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभाग, संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना वारंवार लेखी तसेच तोंडी तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्येक वेळी केवळ आश्वासने देण्यात आली आणि प्रत्यक्षात कोणतीही ठोस दुरुस्ती किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही.

घटनेची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी जैन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी पालक व ग्रामस्थांशी चर्चा करत शाळेच्या तातडीच्या दुरुस्तीबाबत लेखी आश्वासन दिले.

दरम्यान, सोमठाणा गावातील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणत गावासाठी तातडीने नवीन जिल्हा परिषद शाळेची इमारत मंजूर करण्याची मागणी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या आणि वेळेवर दखल न घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

या घटनेमुळे ग्रामीण भागातील शाळांच्या जीर्ण अवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासन आणि प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button