citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrimeYavatmal

दारव्हा-दिग्रसमधील शेतचोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; मुख्य आरोपी अटकेत

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; चार चोरीचे गुन्हे उघड, २.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ | प्रतिनिधी

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा आणि दिग्रस परिसरात शेतकऱ्यांच्या डोकेदुखी ठरलेल्या शेतचोरट्यांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत टोळीच्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून तब्बल २ लाख ५६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारव्हा आणि दिग्रस परिसरात शेतांमधून मोटार पंप, तांब्याची वायर तसेच गोदामांमधून सोयाबीन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुप्त माहितीच्या आधारे इस्लामपूर येथे सापळा रचला.

या कारवाईदरम्यान महमंद मुस्तकीर महमंद मुस्ताक या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपीने आपल्या साथीदारांसह अनेक चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

यानंतर पोलिसांनी आरोपीकडून दोन इलेक्ट्रिक मोटार पंप, सुमारे १५ किलो तांब्याची वायर, सुमारे ४४ क्विंटल सोयाबीन तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली विनाक्रमांकाची वॅगनआर कार जप्त केली. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ५६ हजार ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपासादरम्यान आरोपी दिवसा शेतशिवार आणि गोदामांची रेकी करून रात्रीच्या अंधारात चोरी करत असल्याचे उघड झाले आहे. या कारवाईमुळे दारव्हा आणि दिग्रस पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

दरम्यान, या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच शेतकरी बांधवांनी शेतशिवारात किंवा गोदाम परिसरात संशयास्पद व्यक्ती अथवा वाहन आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एलसीबीच्या या कारवाईमुळे परिसरातील शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला असला, तरी फरार आरोपींना अटक करून अशा चोरीच्या घटनांना पूर्णविराम देण्याचे आव्हान पोलिसांसमोर कायम आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button