citynewskalyanLatest NewsMaharashtra

कल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयात डॉक्टर व नर्सला कथित मारहाण; कारवाईची मागणी

नगरसेवक व समर्थकांवर गंभीर आरोप; सीसीटीव्ही फुटेज समोर, पोलिसांकडून तपास सुरू

कल्याण | प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ऑन ड्युटी महिला डॉक्टर, अन्य डॉक्टर आणि परिचारिकांना कथित मारहाण झाल्याची घटना समोर आली असून यामुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. घटनेचे कथित सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. नवजात बाळाला एनआयसीयू (NICU) उपचारांची आवश्यकता भासू शकते आणि रुग्णालयातील सर्व बेड भरले असल्याने संबंधित रुग्णाला अन्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

याच कारणावरून रुग्णाच्या नातेवाईकांचा डॉक्टरांशी वाद झाला. त्यानंतर नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयात येऊन महिला डॉक्टर, अन्य डॉक्टर आणि तीन महिला परिचारिकांना धक्काबुक्की व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेचा कथित सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये डॉक्टर आणि परिचारिकांसोबत धक्काबुक्की झाल्याचे दिसत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या फुटेजची अधिकृत तपासणी आणि पडताळणी सुरू आहे.

घटनेनंतर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. निषेध म्हणून वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

दरम्यान, मुख्य आरोग्य अधिकारी सादिया पिंजारी यांनी घटना घडल्याची पुष्टी करत या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी संबंधितांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्याचे निर्देश दिल्याची माहिती देत रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून वैद्यकीय संस्थांमध्ये प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button