भोकरदनमध्ये अवैध मद्यसाठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड

हॉटेलवर कारवाई; १.२३ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
जालना | प्रतिनिधी
भोकरदन तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यविक्रीविरोधात मोठी कारवाई करत एका हॉटेलवर धाड टाकली. या कारवाईत विविध प्रकारच्या देशी व विदेशी मद्याचा १ लाख २३ हजार ७८० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून, दोघांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे भोकरदन तालुक्यातील जानेफळ दाभाडी येथील हॉटेल पायल येथे सोमवारी ही कारवाई केली. छाप्यामध्ये विविध ब्रँडच्या देशी व विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या मद्यामध्ये भिंगरी संत्रा, सखू संत्रा, इम्पिरियल ब्ल्यू, रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, मॅकडॉवेल्स नंबर वन या मद्यब्रँडसह बडवायझर आणि कॅनॉन १०००० बिअरच्या शेकडो सिलबंद बाटल्यांचा समावेश आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख २३ हजार ७८० रुपये असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली.
या प्रकरणी बद्रीनाथ रामकिसन मिसाळ आणि हरिदास सुखदेव साळवे या दोघांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. एन. गायकवाड करीत आहेत.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त संगीता दरेकर आणि जालना अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक एल. एम. धनगर यांच्या नेतृत्वातील भरारी पथकाने केली.
या कारवाईमुळे परिसरातील अवैध मद्यविक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधातील कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती नागरिकांनी टोल-फ्री क्रमांक किंवा विभागाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही विभागाने केले आहे.



