Accident NewscitynewsLatest NewsMaharashtraNanded

माहूरमध्ये भाविकांच्या कारचा भीषण अपघात; एअरबॅगमुळे दोघांचा जीव बचावला

धोकादायक वळणावर मोटारसायकलला वाचविताना कार खड्ड्यात उलटली; सुरक्षा उपाययोजनांची मागणी पुन्हा ऐरणीवर

माहूर | प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अशाच एका घटनेत माहूर गडावर दर्शनासाठी येत असलेल्या दोन भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला. मात्र, कारमधील एअरबॅग वेळेत कार्यान्वित झाल्यामुळे दोन्ही भाविकांचा जीव थोडक्यात बचावला.

शुक्रवारी दुपारच्या सुमारास हा अपघात माहूर न्यायालय आणि श्री रेणुका देवी महाविद्यालयादरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण वळणावर घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील तुषार राठोड आणि गजानन राठोड हे दोघे भाविक एमएच-५०-एल-२६२५ क्रमांकाच्या स्विफ्ट कारने माहूर गडावर दर्शनासाठी येत होते. दुपारी सुमारे एक वाजताच्या सुमारास त्यांच्या कारसमोर अचानक एक मोटारसायकल आल्याने चालकाने तिला वाचविण्यासाठी अचानक ब्रेक लावले.

रस्ता पावसामुळे ओला आणि निसरडा असल्याने कारवरील नियंत्रण सुटले. वाहन घसरत रस्त्यालगतच्या न्यायालयाच्या भिंतीजवळील खोल खड्ड्यात जाऊन उलटले. अपघाताची तीव्रता मोठी असली तरी कारमधील एअरबॅग वेळेत उघडल्यामुळे दोन्ही भाविकांना गंभीर दुखापत झाली नाही आणि मोठी जीवितहानी टळली.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते वळण पूर्वीपासूनच अपघातप्रवण म्हणून ओळखले जाते. या परिसरात संरक्षण कठडे, सुरक्षा भिंत आणि प्रभावी इशारा फलकांचा अभाव असल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या धोकादायक वळणावर तातडीने संरक्षण भिंत, कठडे आणि इशारा फलक उभारावेत, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

या अपघाताची नोंद माहूर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button