AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीतील फ्युल हेडक्वार्टर हॉटेलला भीषण आग

अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली; सुमारे २० लाखांचे नुकसान, जीवितहानी नाही

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहरातील मध्यवर्ती बियाणी चौक परिसरातील प्रसिद्ध फ्युल हेडक्वार्टर हॉटेलला गुरुवारी सकाळी भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच संपूर्ण हॉटेल धुराच्या लोटांनी आणि ज्वाळांनी वेढले गेले. अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत सुमारे ४५ ते ५० मिनिटांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी हॉटेलचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पोलिस नियंत्रण कक्षामार्फत सकाळी सुमारे ११.४० वाजता अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन अधीक्षक पंधरे, केंद्रप्रमुख सोनकांबळे आणि पाळी प्रमुख मनोज इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाची वाहने व कर्मचारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

घटनास्थळी पोहोचताच अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले. हॉटेलमधून मोठ्या प्रमाणात धूर आणि ज्वाळा बाहेर पडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच नागरिकांची मोठी गर्दीही घटनास्थळी जमली.

अग्निशमन विभागाच्या तीन फायर लॉरींच्या सहाय्याने आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अल्पावधीत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग शेजारील इमारती आणि व्यावसायिक आस्थापनांपर्यंत पसरण्यापूर्वीच रोखण्यात यश आले.

हॉटेल व्यवस्थापनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आगीत फर्निचर, स्वयंपाकघरातील साहित्य, विद्युत उपकरणे आणि इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अंदाजे २० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

या घटनेतील दिलासादायक बाब म्हणजे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची नोंद नाही. प्राथमिक माहितीनुसार, स्वयंपाकघरात नाश्त्याचे पदार्थ तयार करत असताना आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे बियाणी चौक परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अग्निशमन दलाच्या तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली असून आगीचे नेमके कारण आणि नुकसानाचा अंतिम आकडा तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button