श्रीकृष्ण मंदिरालगतच्या अतिक्रमणावर महापालिकेची कठोर भूमिका

संयुक्त पाहणीनंतर सीमांकन व मोजमापाचे आदेश; अहवालानंतर अतिक्रमण हटविण्याची कारवाई
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती शहरातील मौजा जेवड येथील श्रीकृष्ण मंदिरालगतच्या अनधिकृत अतिक्रमणावर महानगरपालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. संबंधितांना वारंवार नोटिसा आणि सूचना देऊनही अतिक्रमण कायम राहिल्याने महापौर, आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी संयुक्त पाहणी करून जागेचे सीमांकन व मोजमाप करण्याचे आदेश दिले आहेत. सीमांकन अहवाल प्राप्त होताच नियमानुसार अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मौजा जेवड येथील सर्व्हे क्रमांक २७/२ मधील श्रीकृष्ण मंदिरालगतच्या जागेवरील अनधिकृत अतिक्रमणाबाबत महानगरपालिकेकडे सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. यापूर्वी संबंधित अतिक्रमणधारकांना जागा रिकामी करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही अतिक्रमण कायम राहिल्याने प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाईची तयारी सुरू केली आहे.
गुरुवारी महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या उपस्थितीत महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी संयुक्त पाहणी केली. पाहणीदरम्यान अतिक्रमित जागेची सद्यस्थिती, बांधकामाचे स्वरूप आणि उपलब्ध शासकीय अभिलेखांची तपासणी करण्यात आली.
यावेळी महसूल आणि अभियांत्रिकी विभागाला जागेचे अचूक सीमांकन व मोजमाप करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रशासनाच्या माहितीनुसार, सीमांकनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया तातडीने राबविण्यात येईल.
श्रीकृष्ण मंदिर परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ असते. मंदिरालगत झालेल्या अतिक्रमणामुळे भाविकांच्या ये-जा करण्यास अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे वारंवार प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त करून नागरिकांना सुरक्षित व सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महानगरपालिका प्रशासनाने सार्वजनिक व शासकीय जागांवरील अनधिकृत अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले असून, शहरातील इतर सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांवरही अशाच प्रकारे नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे.
सीमांकन आणि मोजमापाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर श्रीकृष्ण मंदिर परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम कधी सुरू होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



